top of page

🚩🚩🚩! महाराणी सईबाई !🚩🚩🚩

  • Aug 13, 2018
  • 2 min read

Updated: Aug 18, 2018

🚩🚩🚩! महाराणी सईबाई !🚩🚩🚩

सईबाईचे मन आज एक आगळाच खेळ खेळत होते. आजवर मनाचा हा असला खेळ त्यांनी कधी पहिला नव्हता. सईच्या असंख्य सावल्या पकडण्याचे ते प्रयत्न करत होते. खेळ ऐन भरात आला होता. असंख्य सावल्या नाचत होत्या. सईबाईचे भान हरपत चालले होते.

फलटणच्या मुधोजीबाबांच्या वाड्यातील परकरी सई ..... पुण्याच्या लालमहालात भोसल्यांची सुनबाई म्हणून आलेली बावरलेली सई ..... जिजाबाईंना ‘आऊ’ म्हणून बिलागताना अगदी सहज त्यांची लेक झालेली सई ..... सईच्या नकळत ‘सईबाई’ झालेली सई ..... राजांच्या वाढत्या राणीवशाबरोबर ‘थोरल्या आक्का’ झालेली सई ..... सखुच्या लग्नात ‘सासुबाई’ झालेली सई ..... राजांचे मंत्री, सुभेदार, सरनोबत यांनी ‘राणीसरकार’ म्हणून अदबमुजरे रुजू केलेली सई ..... राजांच्या पहिल्यावहिल्या बाळाची शंभूराजांची आऊ झालेली कुतार्थ सई .....

किती किती म्हणून सावल्या सईबाईंच्या मिटल्या डोळ्यांना दिसत होत्या पण-पण त्यातील एकसुद्धा त्यांच्या हाताशी येत नव्हती. ‘आम्ही आमची सावलीच हरवून बसली कि काय?’ अशी त्यांना शंका आली. आपले सगळे ‘सईपण’ जिवाच्या निकराने एकवटून त्यांनी स्वत:ला कणाकणात चाचपून पहिले. फक्त एक-एकच सावली त्यांच्या हाताशी लागत होती. पण ती त्यांची नव्हती. ती होती राजांची – त्यांच्या स्वारीची एका जागी क्षणभरसुद्धा न थांबणारी ..... सारखी धावणीची वारेजोड दौड घेणारी ..... सापळ न देता येणारी ..... येता-येताच मोतीलगतचा ऐटदार तुरा हिंदोळवीत पाठमोरी होणारी ..... डोळ्यांनीच सारे सारे बोलणारी ..... त्यांचे सगळे सावळेपण आपलेसे करणारी ..... जगदंब जगदंब पुटपुटणारी .....

त्या सावलीचे शिवदर्शन होताच सईबाईंचे उरले-सुरले भानही हरपले. त्यांच्या मस्तकाची भिंगरी गरगर फिरू लागली. आठवणींची वर्तुळे त्यांच्या सावल्या मनाच्या सरोवरावर रेखू लागली. जीवाची दिवली थरथरू लागली. आठवणींचे माप लवंडले राजांच्या छातीवर कधी माथा टेकताना त्यांच्या गळ्यातील कवड्यांच्या माळेचा झालेला रोमांचक स्पर्श ..... स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधणाऱ्या राजांच्या स्वरीचीच आपण पूजा बांधावी असा आलेला विचार ..... प्रतापगडावर शिवलिंगावरून उचललेल्या शंकर, पार्वती आणि त्यांचा बाळ गणपती यांच्या खुणेचे त्रिदली बिल्वपत्र .....

पोटरी फोडून नुकत्याच बाहेर आलेल्या कणसासारखे वाटणारे आमचे शंभुबाळ ..... त्या सगळ्या आठवणी पार पलीकडच्या वाटत होत्या आता.📷

त्या सावल्यांच्या आणि आठवणींच्या धुंदळीत त्यांना ‘सई’ कुठेच दिसेनाशी झाली. दिसू लागला तो कपाळभर भरलेला मेणमळला, दोनबोटी आडवा, रसरशीत मळवट. अहेवपणाचा ! शिवकर सौभाग्याचा ! त्या मळवटाचे आडवे कुंकू हळूहळू मोठे होऊ लागले म्हणता म्हणता नागऱ्याएवढे झाले क्षणभर दुडदुडले पुन्हा मोठे होत होत आभाळाएवढे झाले आता ते त्यांच्या कापळी मावत नव्हते दोन डोळ्यांत सामावत नव्हते सगळ्या सईबाई त्या आभाळाएवढ्या कुंकवात कुठच्या कुठे विरून गेल्या होत्या ते कुंकू स्वतःशीच निळ्या बोलीत बोलू लागले आपण बोललेले आपणच ध्यान देऊन ऐकू लागले “ गडावरच्या दरुनीमहालात उंबरठ्याआड राहून आम्हास हव तेव्हा स्वारींच्या पायांचे दर्शन घेण होत नव्हत म्हणून आम्ही हे रूप घेतल. आता स्वारींचा घोडा आमच्या नजरटप्याआड कधीच नाही जाणार. दोन डोळ्यांनी खाशासंगती बोलण मनभर झाल नाही म्हणून आम्ही उभ्या आभाळाचे डोळे लेवून स्वारींना ऊरभर बघतो आहोत. आमचा एकाला जीव – शंभुबाळ पदरी टाकले. आता स्वारीच त्यांच्या ‘आबा’ आणि ‘आऊ’. कुंकवाला कसल आऊपण. जमल असत तर शेवटचा म्हणून एकदा या कुंकवाचाच मळवट आम्ही स्वारींच्या पायधुळीन भरून घेतला असता. “

आपल्या आभाळाएवढ्या मळवाटाच्या रसरशीत लाल कुंकवात पुरती न्हाऊन निघालेली सतेज अशी राजांची रसरशीत, तांबडी सावली फक्त सईबाईंना दिसू लागली. ‘हे अस रूप कधी नजरेला पडलच नाही’. आता सईबाईसाहेब एक क्षणभरही थांबू शकत नव्हत्या. वेळ झाला तर ती रूपवैभवी चैतन्यलाल सावली हातची निसटेल, त्या नुसत्या शंकेनेच त्या थरारल्या. त्यांच्या कृश पायांत कसलेतरी उदंड बळ संचारले. त्या खड्या झाल्या. त्या सावलीचे पाय धरून ठेवण्यासाठी सईबाई भरल्या माळवटाने इतमामात चालल्या. त्यांच्या ओठांतील तुळशीपत्र त्यांना रोखण्यासाठी क्षणभर थरथरले.

पण सईबाईसाहेब गेल्या ..... कायमच्या ..... पार पार पलीकडे .....

--- 'छावा' मधून

📷☀📷🔥📷⛳|| हर हर महादेव, जय श्रीराम ||📷⛳📷🔥📷☀ 📷⛳📷🔥📷☀|| जय भवानी, जय शिवाजी....||📷⛳📷🔥📷☀


 
 
 

Comments


bottom of page